पिंपरी : प्रभाग क्रमांक दोन मोशी-जाधववाडी भागाचे प्रतिनिधित्व करणारे भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला पहिला झटका असल्याचं बोलले जात आहे.
प्रभागाच्या विकासासाठी सहकार्य केले नाही आणि पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता असे सांगत वसंत बोराटे यांनी आज (बुधवारी) महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.
वसंत बोराटे प्रभाग क्रमांक दोन मोशी-जाधववाडी भागातून 2017 मध्ये भाजपच्या चिन्हावर महापालिकेवर निवडून आले आहेत. शांत, संयमी त्यांचा स्वभाव आहे. मागील पाच वर्षात कारभारी महेश लांडगे यांनी बोराटे यांना पदासाठी खेळवत ठेवले. नाराज बोराटे यांची विधी समितीच्या सदस्यपदी बोळवण करण्याचा प्रयत्न केला.
बोराटे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यांना महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, विषय समिती सभापती, प्रभाग समिती अध्यक्ष असे एकही पद दिले नाही. त्यामुळे त्यांची नाराजी वाढली होती. या नाराजीतून त्यांनी भाजपला रामराम ठोकला असून बोराटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नगरसेवक वसंत बोराटे यांचा राजीनामा आला असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले.