मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरेंना दिले नव्हते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला आहे.
ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या नागरी सत्कारात मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवले आहे. या कार्यक्रमात 175 विविध संस्थांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली तेव्हा त्यांना विचारले की, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन खरेच बंद दारात दिले होते का? यावर ते (मोदी-शहा) म्हणाले की, बिहारमध्ये नितीश कुमारांचे आमदार कमी असूनही भाजप त्यांना मुख्यमंत्री बनवू शकते. तुमच्याकडे 50 आमदार आणि आमचे 106 आमदार असूनही आम्ही तुम्हाला (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री बनवू शकते. त्यामुळे ठाकरेंना आम्ही वचन दिले असते तर ते पूर्ण केले असते.
भविष्यात पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याची ऑफर आली तर आपण उद्धव यांच्या शिवसेनेसोबत जाणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट केले आहेत. शिंदे म्हणाले, ‘आम्ही बाळासाहेबांच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासाहेब म्हणायचे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीच शिवसेनेचे मित्र होऊ शकत नाहीत. हे दोन्ही पक्ष शिवसेनेचे शत्रू आहेत. या पक्षांसोबत कधी युती करण्याची संधी आली तर मी माझी दुकान बंद करेन. त्यामुळे मी यापुढे उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाही.’
शिंदे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अडीच वर्षे सरकारमध्ये राहिलो असतो तर शिवसेनेची काय अवस्था झाली असती. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. महाविकास आघाडीत असताना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कांग्रेसचाच असेल, असे राष्ट्रवादी उघडपणे सांगत होती. पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांचे 100 हून अधिक आमदार निवडणूक जिंकतील, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेस करत होती.