भाजपा आजी-माजी शहराध्यक्ष म्हणतात… प्रभाग रचना आमच्यासाठी अनुकूलच!

0

पिंपरी : निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली प्रभाग रचना भाजपासाठी अनुकूलच आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचे पूर्वीपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील. तसेच, तीन-चार ठिकाणी प्रभाग रचनेबाबत कायदेशीर हरकती घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असा दावा  भाजपाच्या आजी-माजी शहराध्यक्षांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग रचनेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. याबाबत भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, गतवेळी चार सदस्यीय प्रभाग पद्धती होती. त्यावेळी भाजपाला ७७ जागा मिळाल्या आहेत. आता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार भाजपा गतवेळीपेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. निवडणूक आयोग प्रशासनाकडून नियमाप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आली आहे. तीन-चार ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हस्तक्षेप करुन प्रभाग रचना असंवैधानिकपद्धतीने केल्याचे लक्षात आले आहे. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेवून हरकती घेणार आहोत.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडच्या विकासाच्या दृष्टीने भाजपाने चांगले काम केले आहे. भाजपाचे पदाधिकारी, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. प्रत्येक प्रभागात दोन-तीन इच्छुक आणि प्रभावी उमेदवार केवळ भाजपाकडे आहेत. विरोधी पक्षाकडे अने क प्रभागांमध्ये उमेदवारही नाही. त्यामुळे निश्चितपणाने भाजपा केलेल्या कामाचाच्या जोरावर चांगले यश मिळवणार आहे.

संघटन आणि विकासाच्या जोरावर भाजपाला यश मिळणार…
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार हा निष्क्रीयतेचा आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी गेल्या अडीच वर्षांत याचा अनुभव घेतला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही गेल्या पाच वर्षांत शहरात ठेवली. याला मतदार समर्थन देतील आणि गेल्यावेळीपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावाही आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.