नवी दिल्ली ः ”भाजपानं राष्ट्रीय एकतेला तुकड्यांमध्ये तोडलं आहे. त्यांनी हिंदुंना मुस्लिमांविरोधात भडकावलं आहे. आता ते शिख बांधवांबद्दलही तसंच करत आहेत. देशभक्ती असलेल्या पंजाबला भाजपा सांप्रदायिकतेच्या आगीत ढकलत आहे”, अशी टीका शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भाजपावर केला.
भाजपाच्या नेत्या बबीता फोगट यांनी शेतकरी आंदोलन तुकडे तुकडे गॅंगने हायजॅक केले, असे वक्तव्य केले होते. त्यावर बादल म्हणाले की,”भाजपाच देशातील खरी तुकडे तुकडे गॅंग आहे. आपण जय जवान, जय किसान म्हणतो. आज जवानही आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि शेतकरीही. नक्की काय हवं आहे? तर, भाजपा सरकारनं आपल्या अहंकारातून बाहेर येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. ज्यांनी नवा कायदा केला, त्यांनी कधी शेती केली नाही. केंद्रातील मोदी सरकार हे अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मोदी सरकार लोकांना धर्माच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप बादल यांनी केला.
”जे सरकारच्या बाजूने असतात त्यांना देशभक्त ठरवलं जातं आणि जे सरकारच्या विरोधात असतात त्यांना तुकडे तुकडे म्हंटलं जातं. खरी तुकडे तुकडे गॅंग भाजपा आहे. त्यांनी यापूर्वी हिंदू-मुस्लिमांच्या संबंधांचे तुकडे केले आणि शिखांमध्ये ते तुकडे तुकडे करत आहेत”, अशा टीका त्यांना भाजपावर केली.