पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झालं. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहेत
भाजपला तीन तर आघाडीला तीन जागा मिळाल्या. या निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीची मते फुटली नसल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
पवार म्हणाले, “आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेणं हा भाजपचा रडीचा डाव होता. महाविकास आघाडीच्या कोट्यामध्ये जी मते होती, त्यात फरक पडलेला नाही, भाजपच्या एकाही मताला धक्का बसला नाही. भाजपला पडलेले अधिकच मत हे आघाडीचे नाही. भाजपच्या विजयामुळे धक्का बसलेला नाही,” “मतांची संख्या पाहिली शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची मतं फुटली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल पटेल यांना एक मत अतिरिक्त मिळाले, याची मला कल्पना होती,” असे पवार यांनी नमूद केलं.
राजकारणात रिस्क घ्यावी लागतेच “जो चमत्कार झाला तो मान्य करावा लागेल. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली. अपक्षांना वळविण्यात त्यांनी केलेली खेळी यशस्वी झाली. विरोधकांकडून रडीचा डाव खेळण्यात आला. ही निवडणूक चुरशीची झाली. या निकालाचा आघाडीसरकारवर परिणाम होणार नाही,” असे पवार म्हणाले. “शिवसेनेनं संजय पवार यांना निवडणुकीत उभं केलं, राजकारणात रिस्क घ्यावी लागतेच,” असेही पवार म्हणाले.
ते ज्यादा मत शिवसेना जाणार नव्हतं
“राष्ट्रवादीला आलेले ज्यादा मत हे शिवसेना जाणार नव्हतं, आमच्या विरोधकांच्या कोट्यातील एक मत होते, ते राष्ट्रवादीला आले. त्यांच्यातील अनेक लोक आहेत, ज्यांनी कधी काळी माझ्याबरोबर काम केलं आहे. मी शब्द टाकला तर ते नाही म्हणत नाही, पण मी त्यात पडलो नाही,” असे पवार यांनी स्पष्ट केलं.