मुंबई : मंत्री नवाब मलिक यांची बुधवारी ८ तास चौकशी केल्यानंतर ED ने त्यांना अटक केली. त्यानंतर पीएमएलए न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. या घडामोडी सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.
दरम्यान, मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी जल्लोष केला. कंबोज यांच्या घराजवळ काही कार्यकर्ते जमले होते. जल्लोष करत असताना त्यांनी म्यानातून तलवार काढली. दरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेते मोहित कंबोज यांच्यातील वाद काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी क्रुझ ड्रग्स पार्टीवर धाड टाकल्यानंतर एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिक यांनी मोर्चा उघडला होता. एका पत्रकार परिषदेत मलिक यांनी कंबोज यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर कंबोज यांनी मलिकांच्या बेनामी संपत्ती आणि ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले होते.