मुंबई : जळगावमधील वसतिगृहात पोलिसांनी केलेल्या कृत्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनाच शिस्त नाही, ते इतरांना काय शिस्त लावणार? असा संतप्त सवाल पंकजा मुंडे यांनी केला.
बीड जिल्हा सहकारी बँक, महिलांवरील अत्याचार आणि जळगावमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिलांवरील अत्याचार वाढत असून त्यावर सरकारकडून काहीही कारवाई होत नसल्याची तक्रार राज्यापालांकडे केली.
जळगावातील घटनेने महिलांवरील अत्याचाराचं प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. राज्यात अरेरावी सुरू आहे. जळगावातील घटनेत पोलीस अधिकारीच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यात चाललंय तरी काय? ज्या राज्यातील सत्तेतील लोकच आपल्या प्रतिमेचं पोषण करू शकत नाही. तेच जर अन्याय करणारे असतील तर दुसऱ्यांना काय शिस्त लागणार आहे?, असा सवाल पंकजा यांनी केला.
मी विधानसभेत नाही. पण सभागृहाबाहेर महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवणार आहे. जळगाव घटनेतील संबंधितांना आधी निलंबित करा आणि मगच चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच या घटनेमध्ये लक्ष घालण्याची विनंती राज्यपालांना केल्याचंही त्यांनी सांगितलं.