चिंचवड मतदार संघात भाजपाला खिंडार; माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
भाजपाचे आणखी ९ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात- अभय मांढरे
मुंबई : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘दांडपट्टा’ सुरू केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला पहिला दणका चिंचवड विधानसभा मतदार संघात दिला असून, माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपा नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी आज मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारणे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, उद्योजक अभय मांढरे यावेळी उपस्थित होते.
बारणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संतोष बारणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या पत्नी माया बारणे थेरगावातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर २०१७ मध्ये भाजपाच्या ‘कमळा’वर त्या सलग दुसऱ्यावेळी निवडून आल्या आहेत. थेरगावात त्यांचे वर्चस्व आहे. त्यांचे पती संतोष बारणे यांनी आज पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
ये तो ट्रेलर है…पिक्चर अभी बाकी है… : अभय मांढरे
थेरगाव भागात बारणे कुटुंबियांची मोठी ताकद असून, भाजपाला तगडे आव्हान मिळणार आहे. भाजपाच्या कारभाराला वैतागून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपातील आणखी नऊ नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. हळूहळू सर्वांचे प्रवेश होतील. काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या पिंपळेगुरव प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका, महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती आणि माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे भाजपाच्या जहाजाला गळती लागली असून, आगामी काळात भाजपाच्या भ्रष्टाचाराचे जहाज बुडणार आहे. ‘‘ ये तो ट्रेलर है…पिक्चर अभी बाकी है…अशी खोचक टीप्पण्णी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत आणि उद्योजक अभय मांढरे यांनी केली आहे.