पक्षाच्या त्रासाला कंटाळून भाजप खासदाराची आत्महत्या; काँग्रेसचा आरोप

0

मुंबई : दादरा नगर हवेलीचे भाजपचे खासदार मोहन डेलकर यांनी पक्षाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असून याची सखोल चौकशी करावी आणि योग्य कारवाई करावी ; अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे बुधवारी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलात आत्महत्या  केली. डेलकर यांनी  गेल्या दीड वर्षांपासून आपल्यावरील  मोठ्या दबावाची आणि छळवणुकीबद्दलची व्यथा स्वतःच व्हिडिओद्वारे, तसेच संसदेमध्ये भाषणातूनही मांडली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये  भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे.

मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा म्हणून त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली असावी, असे सांगून सावंत म्हणाले की, नोकरशाही, पोलीस, तपास यंत्रणा आणि स्थानिक गुंडांकडूनही होणाऱ्या छळवणुकीबाबत त्यांनी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली होती. तसेच त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रफुल्ल पटेल यांचे नाव आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळात काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सोशल मीडिया विभागाचे विनय खामकर हेही सहभागी होते.

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या चिठ्ठीचे भाषांतर झाले आहे. त्यातील आरोपानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.  डेलकर यांनी त्यांच्या आत्महत्येच्या चिठ्ठीत गुजरातच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह काही राजकीय मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत पोलिसांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. अशात पहिल्या टप्प्यात पोलिसांनी भाषातज्ज्ञांच्या मदतीने आत्महत्येच्या चिठ्ठीचे भाषांतर करवून घेतले आहे. चिठ्ठीचे भाषांतर झाले असल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांंनी दुजोरा दिला आहे. तसेच आत्महत्या केलेल्या सी ग्रीन साउथ या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचे जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.