भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

0

 

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली असून, पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बापट यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, याबाबत सविस्तर माहिती देण्यास डॉक्टरांकडून नकार देण्यात येत होता. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी आम्ही प्रकृतीसंदर्भात बुलेटीन काढू असे सांगितले. बुलेटीनमध्येही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्यांचे निधन झाले असल्याची माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांना प्रतिक्रिया देताना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, खासदार गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. पुण्याच्या राजकारणात त्यांचे मोठे महत्त्व आहे. कार्यकर्ता बनवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते.

ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले, खूप वाईट वाटले. राजकारणात गिरीश बापट आणि आम्ही अनेकदा एकत्र काम केले. गिरीश बापट यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी अतिशय सलोख्याचे संबंध होते. केंद्रात मंत्रीपद मिळूनही त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. त्यांना आपल्या पदाचा कधीही गर्व आला नाही.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, अतिशय जवळचा मित्र आज आपल्यातून गेले आहेत. गिरीश बापट अतिशय दिलखुसास असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने भाजप पक्षाची खूप मोठी हानी होती. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी लोकांशी संबंध कसे जोडायचे, हे आम्हाला शिकवले. या वर्षभरात त्यांना आम्ही 5 ते 6 वेळा भेटायला गेलो. मात्र, कधीही त्यांच्या चेहऱ्यावर त्रागा दिसला नाही, असे ते दिलखुसास व्यक्तिमत्त्व होते. गिरीश बापट यांचे कुटंब फार मोठे आहे. आम्ही सर्वजण या क्षणी त्यांच्या कुटुंबासोबत आहोत.

गिरीश बापट हे आपल्या दांडग्या जनसंपर्कासाठी ओळखले जात. आपल्या तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा अजूनही दबदबा होता.

1995 मध्ये गिरीश बापट यांनी आमदारकीची निवडणूक लढवली. पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. 1996 साली त्यांना भाजपने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये त्यांना खासदारकीचे तिकीट मिळाले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

Leave A Reply

Your email address will not be published.