पिंपरी : पिंपळे निलख येथील ज्युपिटर हॉस्पिटल ते जगताप डेअरी या डीपी रस्त्याची साफसफाई करण्यात आली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या पुढाकाराने महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे रस्ता आता चकाचक होणार आहे.
प्रभाग क्रमांक २६ मध्ये पिंपळे निलख, विशालनगर, पार्कस्ट्रिट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर परिसर, अण्णाभाऊ साठेनगर, वेणुनगर भाग, रक्षक सोसायटी आदी भागाचा समावेश आहे.
ज्युपिटर हॉस्पिटल ते जगताप डेअरी या डीपी रस्त्यावर ठिकठिकाणी राडारोडा पडला होता. काही ठिकाणी गवत आणि झुडपेही वाढली होती. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. तसेच, परिसरातील नागरिकांकडून कार्यवाहीची अपेक्षाही व्यक्त होत होती. याची दखल घेत भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
ड- प्रभाग समितीचे अध्यक्ष सागर आंघोळकर, स्थानिक नगरसेविका आरती चोंधे, पवन कामठे, आरोग्य अधिकारी शशिकांत मोरे यांच्यासह आरोग्य व स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची तात्काळ पाहणी केली. तसेच, साफसफाईची कारवाई करुन रस्ता चकाचक केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे म्हणाले की, परिसरात विकासकामे आणि बांधकाम प्रकल्प मोठ्याप्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांवर राडारोडा आणि दुरावस्ता झाली आहे. काही ठिकाणी खड्डेही पडले होते. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय करुन समस्या मार्गी लावली आहे. आगामी दोन-तीन दिवसांत साफसफाईचे काम पूर्ण होणार आहे.