मुंबई : पोलिसांच्या बदल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप केले आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक फडणवीसांनी केलेले आरोप फेटाळून लावत रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच फडणवीस फक्त खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचे म्हटले आहे.
राज्याच्या पोलीस दलातील बदल्यांचे रॅकेट तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी उघडकीस आणल होते. यात अनेक बडे अधिकारी आणि काही राजकारण्यांचीही नावे असल्याची माहिती त्यांनी दिली होती. पण त्यावर मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी कोणतीची कारवाई केली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक फडणवीसांनी केलेले आरोप फेटाळून लावले. फडणवीस दिल्लीत जाऊन गृहसचिवांना पुरावे देण्याची भाषा ते करत आहेत. दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची बदनामी करायची इतकाच त्यांचा उद्देश असल्याचा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.
नवाब मलिक मंगळवारी (दि. 23) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात जेंव्हा महाविकास आघाडीचे सरकार बनत होते. त्यावेळी रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप केले. त्या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या. बदल्यांच्या रॅकेट संदर्भात फडणवीसांच्या म्हणण्यानुसार शुक्लानी परवानगी घेऊन फोन टॅप केले आहेत. पण शुक्लांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार पोलिसांच्या बदल्या झाल्याच नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे.
हे सारे फडणवीसांना माहिती असूनही ते फक्त सरकारची बदनामी करत आहेत. देशमुखांवर केलेल्या आरोपांत कोणतही तथ्य नसून ते 27 फेब्रुवारीपर्यंत कुणालाही भेटलेले नाहीत. फडणवीस केवळ बेछुट आरोप करून सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहेत. राजकीयदृष्ट्या हे सरकार पाडता आले नाही म्हणून आता अधिकाऱ्यांचा वापर करुन ते सरकार पाडण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही मलिक यांनी यावेळी केला आहे.