अश्विनी जगताप यांना जास्तीच्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, शंकर जगताप मैदानात

0

पिंपरी : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी गुरूवारी पिंपळेगुरवच्या मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. येथील जनतेने कायमच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बाजूने राहून मताधिक्य दिले आहे. आता या दुःखाच्या प्रसंगातही माझ्या पिंपळेगुरवकरांनी आम्हाला साथ देऊन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन शंकर जगताप यांनी पिंपळेगुरवच्या जनतेला केले. पडळकर, लाड, भारतीय आणि जगताप यांनी पदयात्रा काढून पिंपळेगुरव पिंजून काढले. त्यामध्ये तरूणाई मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय यांना सोबत घेऊन गुरूवारी पिंपळेगुरवमध्ये पदयात्रा काढली. प्रचार संपण्यासाठी एक दिवस बाकी असल्याने शंकर जगताप यांनी घरच्या मैदानात उतरून घरच्या माणसांना भाजपला मताधिक्याने निवडून देण्याची साद घातली. या पदयात्रेत तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तुफान गर्दी केलेल्या तरुणाईकडून दिल्या जाणाऱ्या भाजप विजयाच्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण पिंपळेगुरव दणाणून गेले होते. पिंपळेगुरवमध्ये ओन्ली कमळचा नारा घुमत होता.

यावेळी माजी नगरसेवक सागर आंगोळकर, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, नरेश जगताप, रमेश काशीद, शशिकांत दुधारे, अमर आदियाल, शिवाजी कदम, गणपत कदम यांच्यासह भाजप-शिवसेना महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पदयात्रेचे नागरिकांनीही जोरदार स्वागत केले. गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय व शंकर जगताप यांचे महिलांनी औक्षण करून विजयी भवचा आशिर्वाद दिला. लक्ष्मणभाऊंच्या माघारी पिंपळेगुरवची जनता जगताप कुटुंबाला एकटे पडू देणार नसल्याचा विश्वास दिला. नागरिकांचा हा विश्वास आणि मिळणारा प्रतिसाद पाहून शंकर जगताप यांनीही संपूर्ण चिंचवड मतदारसंघाच्या आणखी विकासासाठी आणि प्रगतीसाठी भाजपवर आणि जगताप कुटुंबावर असाच आशिर्वाद कायम ठेवा, असे आवाहन नागरिकांना केले. ज्येष्ठ नागरिक व महिलांचे चरण स्पर्श करून त्यांचेही त्यांनी आशिर्वाद घेतले. तसेच अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखाचे मताधिक्य देण्याचे आवाहन केले.    

Leave A Reply

Your email address will not be published.