पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपला आणखी मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे रवि लांडगे आणि चिखलीचे संजय नेवाळे यांनी आज (बुधवारी) आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला सहावा झटका बसला आहे.
यापूर्वी भाजपचे नगरसेवक असलेल्या मोशीतील वसंत बोराटे, पिंपळेगुरवच्या चंदा लोखंडे, पिंपळेनिलखचे तुषार कामठे यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत. आता रवि लांडगे आणि संजय नेवाळे यांनी आज राजीनामे दिले आहेत.
रवि लांडगे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ता होते. 2017 च्या महापालिका निवडणुकीत भोसरीतील धावडेवस्ती प्रभागातून बिनविरोध निवडून आले होते. निष्ठावान असूनही मागील पाच वर्षे त्यांना महापालिकेतील एकही पद दिले नाही. त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी अखेरीस आज भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे.
तर, संजय नेवाळे 2017 च्या निवडणुकीती चिखलीतून भाजपच्या तिटीकावर निवडून आले होते. त्यांनी महापालिका क्रीडा समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. तेही भाजप, आमदार महेश लांडगे यांच्यावर नाराज होते. त्यांनीही आज राजीनामा दिला आहे. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.