भाजपचा उधळलेला वारू राष्ट्रवादी व समविचारी पक्ष रोखणार : संजोग वाघेरे पाटील

0

पिंपरी : हिंद कामगार संघटना (इंटक) च्या माध्यमातून डॉ. कैलास कदम यांनी कामगार क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मागील सात वर्षात कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेतृत्व करीत असताना पुणे जिल्ह्यातील शेकडो संघटीत व असंघटीत कामगार संघटनांना एकत्र करुन त्यांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरुन शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पद भूषवित असताना डॉ. कैलास कदम यांनी सभागृहात विरोधी पक्ष म्हणून सक्षम भूमिका बजावली आहे. मागील सार्वत्रिक निवडणूकानंतर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपचा उधळलेला वारू राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्ष एकत्र येऊन रोखू आणि भाजपला सत्तेतून पायउतार करु असे प्रतिपादन संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

डॉ. कैलास कदम यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी डॉ. कदम यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फझल शेख, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, कायदा सेलचे शहराध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे, कामगार सेलचे शहराध्यक्ष शशिकांत देशमुख, पदवीधर सेलचे शहराध्यक्ष माधव पाटील तसेच शाम अगरवाल सर्जेराव जगताप, सचिन आवटे आदी उपस्थित होते. तसेच शनिवारी झालेल्या एक पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, शिवसेनेचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले आदींनी डॉ. कैलास कदम यांचे अभिनंदन केले.

यावेळी संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते भूमिपुजन झालेल्या ही औद्योगिक नगरी नव्वदच्या दशकानंतर वेगाने विकसित होत आहे. स्व. खासदार आण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली पाच गावांचे एकत्रीकरण करुन स्थापन झालेल्या नगरपालिकेने आता जगात ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी आणि मेट्रो सिटी’ म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आदरणीय लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा राष्ट्रवादीने सर्वांगिण विकास केला आहे. माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचेही योगदान आहे. आजपर्यंत या शहरातील राजकारणात गावकी – भावकीचे वर्चस्व राहिले आहे. याला अपवाद ठरेल अशी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी कामगार नेते डॉ. कैलास कदम यांची शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. याचा कॉंग्रेससह समविचारी पक्षांना निश्चितच फायदा होईल. सर्वच राजकीय पक्षांमध्ये पक्षीय मतभेद, अंतर्गत वाद, कलह सुरु असताना वाघेरे पाटील यांनी डॉ. कदम यांना दिलेल्या शुभेच्छा म्हणजे पिंपरी चिंचवड शहराच्या पुढील राजकारणाची आदर्श दिशा ठरेल. या महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाची एकहाती सत्ता आहे. भाजपचा उधळलेला वारू रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांसमोर आहे. पुढील सार्वत्रिक निवडणूकीत सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेत निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी ही चांगल्या आदर्श राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी करीत आहे.

यावेळी बोलताना वाघेरे पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोघे एकमेकांशी निधर्मी आघाडी म्हणून बांधलेले आहेत. पिंपरी चिंचवड शहराला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भरभराटीचे दिवस दाखवले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात या शहराला विकासाच्या वाटेवर नेऊन ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता स्थापन केली. तरीदेखील काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत या शहरात मित्र पक्ष म्हणूनच काम केले आहे. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रपणे मित्र पक्ष म्हणून काम करत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ‘हिट’ ठरला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढली हा प्रयोग यशस्वी झाला. त्याचप्रमाणे आता तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राबवण्याची चाचपणी सुरू आहे. याबाबत अद्याप खात्रीलायक सांगता येणे शक्य नसले. तरीही स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी करून निवडणुका लढविणे आणि भाजपचा उधळलेला वारू रोखण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही संजोग वाघेरे पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.