हडपसर : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज मंतरवाडी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अनिल दादा पवार (रा. काळेपडळ, हडपसर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. आज सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळच्या सुमारास कात्रज मंतरवाडी रस्त्यापासून काही अंतरावर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान मयत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर घाव आहेत. तसेच मृतदेहाचे शेजारी दारूच्या रिकाम्या बाटल्या ही पोलिसांना आढळल्या. कुणीतरी व्यक्तीने अज्ञात कारणावरून हा खून केला असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.