पिंपरी : गुरुवारी रक्षाबंधन दिवशी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. चाकण जवळील मेदनकरवाडी (ता. खेड) येथील बंगलावस्ती भागात गुरुवारी (दि.11 ऑगस्ट ) एका पाच वर्षीय मुलीचा छिन्नविछिन्न अस्वस्थेत मृतदेह आढळला. ही मुलगी बुधवारी (दि. 10 ऑगस्ट) दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होती. या मुलीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलीच्या शरीराचे लचके तोडल्याची बाब समोर आली आहे. तिचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तिचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
कृष्णा सतेन्द्र ठाकूर (5 वर्षे, सध्या रा. बंगलावस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. रामभोजापूर, पोस्ट- छपरा, उत्तरप्रदेश) असे मृतदेह मिळून आलेल्या चिमुरड्या मुलीचे नाव आहे. कृष्णा ही बुधवारी दुपारी 2 वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या नातेवाईकांनी याबाबत चाकण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार चाकण पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस या घटनेचा तपास करत होते.
त्यानंतर राहत्या घरापासून काही अंतरावर झाडाझुडपात बुधवारी सकाळी कृष्णा हिचा मृतदेह काही नागरिकांना दिसला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. या बाबत पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा बुधवारी बेपत्ता होती. त्या बाबत चाकण पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल होता. गुरुवारी सकाळी कृष्णा हिचा मृतदेह श्वानांकडून ओढून नेला जात असल्याचे स्थानिकांनी पहिले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
श्वानांनी कृष्णा हिच्या शरीराचे लचके तोडलेले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शवविच्छेदन व उत्तरीय तपासणी नंतर या बाबत अधिक स्पष्टता येईल. घटनास्थळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर, काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
दरम्यान पोलिसांनी बंगला वस्ती भागात राहणाऱ्या नागरिकांकडे कसून चौकशी सुरु केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर कामगार वास्तव्यास असल्याने त्या सर्वांच्या मागील दोन दिवसातील हालचाली आणि या भागातील सीसीटीव्ही तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.