पुणे : पंजाब मधील तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या बोगस आर्मी ऑफिसरला पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने अटक केली आहे. स्वतःला कर्नल म्हणवणारा बोगस आर्मी ऑफिसर मुळात पुण्यातील रिक्षावाला असल्याचे तपासात समोर आले आहे.
संजय रघुनाथ सावंत (55 रा. बोपोडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याने पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात स्वतः भारतीय सैन्यात कर्नल म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पठाणकोट येथील तरुणांना भारतीय सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या पालकांकडून त्याने यासाठी लाखो रुपये उकळले व तेथून तो पळून गेला. पंजाब पोलीस त्याच्या मागावर होतीच. तसेच पुणे पोलीस व मिलीट्री इंटेलिजन्स यांना तो पुण्यात असल्याची खबर मिळाली., मात्र त्याचा पुर्ण पत्ता माहिती नसल्याने पोलिसांना अडचणी येत होत्या.
तपासात पोलिसांना तो डीओडी डेपो देहुरोड येथून लेबर म्हणून नोकरीस असल्याचे कळाले. मात्र तेथूनही तो दोन वर्षापूर्वी निवृत्त झाला होता. त्यानेपुढे रिक्षा चालविण्याचा धंदा सरु केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यासाठी पोलिसांनी पुण्यातील सुमारे 150 ते 200 रिक्षा कसून तपासल्या. आरोपी हा पत्ता बदलून पिंपळे गुरव येथे वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्याकडे कसून तपास केला असता त्यानेच ही फसवणूक केल्याचे कबुल केले. त्याला अटक केल्याची माहिती पंजाब पोलिसांना दिल्यानंतर पठाणकोट पोलीसांनी त्याचा कायदेशीर ताबा घेतला असून पठाणकोट पोलीस त्याचा पुढील तपास करीत आहेत.