पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची कामे मिळविण्यासाठी बोगस एफडीआर (फिक्स डिपॉझिट रिसिट) सादर करून कामे घेणाऱ्या पाच ठेकेदारांवर अखेर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मे. पाटील ऍण्ड असोसिएटचे मालक सूजित सूर्यकांत पाटील (26, रा. भोसरी) याच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. पाटील ऍण्ड असोसिएटने 29 जानेवारी 2019 ते 19 जानेवारी 2020 या कालावधीत पालिकेची पाच स्थापत्य विषयक कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बॅंक-आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.
मे. कृती कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल हनुमंत कुऱ्हाडे (29, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. कृती कन्स्ट्रक्शनने 24 डिसेंबर 2019 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक चार कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बॅंक, आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.
मे. एस. बी. सवईचे मालक संजय बबन सवई (रा. चिंचवड) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. एस. बी. सवईने 9 ऑक्टोबर 2018 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक सात कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बॅंक, आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.
मे. वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे (47, रा. भोसरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. वैदेही कन्स्ट्रक्शनने 9 ऑक्टोबर 2018 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक 12 कामे घेतली होती. त्यात त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र राजगुरू नगर शाखा, पंजाब नॅशनल बॅंक नाना पेठ पुणे यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बॅंकांनी दिला नसल्याचे आढळून आले आहे.
मे. डी. डी. कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश मोहनलाल नवानी (28, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. डी. डी. कन्स्ट्रक्शनने 27 जून 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक 24 कामे घेतली होती. त्यात त्यांनी पंजाब नॅशनल बॅंक नाना पेठ पुणे शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बॅंकेने दिला नसल्याचे आढळून आले आहे.