मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रॅंड नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून मंत्रालयात बोगस नोकर भरती सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यात मंत्रालयातील कर्मचारीच सहभागी असून, त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समजते.
यशवंत कदम यांनी या प्रकरणी गोवंडी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी शुभम मोहिते, निखिल माळवे, नीलेश कुडतरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातल्या निखिल माळवेला बेड्या ठोकल्यात. फसवण्यात आलेल्या तरुणांची संख्या वाढू शकते, असा अंदाजही आहे.
धनंजय मुंडे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईत उपचार झाले. आता तब्येत सुधारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर हजेरी लावली. ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेत. तर दुसरीकडे त्यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती सुरू झाल्याचे समोर आले आहे. माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून अनेकांना फसवण्यात आले आहे.
गोवंडीचे यशवंत कदम हे महापालिकेतून निवृत्त झालेत. त्यांचा लहान मुलगा रणजितने व्हॉटसअॅपवर आलेली नोकर भरतीची जाहिरात पाहिली. त्यानंतर निखिल माळवेशी संपर्क साधला. त्याने मंत्रालयातल्या सामाजिक न्याय विभागात लिपिक म्हणून भरती करण्याचे आमिष दाखवले. या पदाच्या मुलाखतीसाठी 30 हजार रुपये उकळले. त्याने धनंजय मुंडे यांच्यासोबतचे काढलेले फोटो सोशल मीडियावर वापरून अनेकांचा विश्वास संपादन केला. हाच कित्ता त्याच्या साथीदारांनी गिरवला.
रत्नजितला मंत्रालयात मुलाखतीसाठी बोलावले. तिथे शुभम मोहितेसोबत ओळख करून दिली. त्याने कांबळे नावाच्या व्यक्तीला रत्नजितची फाइल दिली. त्यानंतर रत्नजितला बनावट आदेशपत्राचा मेल केला. त्यानुसार 29 जानेवारी 2021 रोजी रत्नजित जॉइन होण्यासाठी मंत्रालयात गेला. मात्र, तेव्हापासून शुभम मोहितेशी त्याचा संपर्क झाला नाही. शेवटी त्याने पोलिसांकडे धाव घेतली.
धनंजय मुंडे यांना या भरती प्रकरणी विचारले असता माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, शुभम मोहिते नावाच्या कोणत्याही व्यक्तीला मी ओळखत नाही. अशी कुठलीही व्यक्ती कार्यरत नव्हती. त्याने दिलेले आदेशपत्र बनावट आहे. तसे पत्र देण्यात येत नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. पोलिसांकडेही मी चौकशीची मागणी करणार आहे.