पुणे : रविवारी रात्री झालेल्या भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या एका बुकीला रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पुणे शहरातील डी मोरा पबमध्ये मीटिंग घेत असताना त्याला ताब्यात घेतले. श्रीपाल यादव असे ताब्यात घेतलेल्या बुकीचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शहराच्या मध्यवस्तीतील डी मोरा पबमध्ये छापा मारून ही कारवाई केली. यावेळी बुकी श्रीपाद यादव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून रोख रक्कम मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
श्रीपाद यादव हा यापूर्वी देखील बेटिंग घेत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. यापूर्वी तो पिंपरी चिंचवड शहरातून बेटिंगचा धंदा करत होता. पिंपरी चिंचवड पोलीस आणि मागील वर्षी त्याला आयपीएलमधील क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असताना अटक केली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पुण्यात हलवला होता. दरम्यान, रविवारी रात्री झालेल्या या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.