फलटण : किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली असून कोल्हापूरच्या किशोर व विदर्भाच्या किशोरींनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या मुलांची गाठ केरळबरोबर तर मुलींची गाठ गुजरातबरोबर पडेल. कोल्हापूरची मुले पश्चिम बंगाल बरोबर तर विदर्भाच्या मुली दिल्ली बरोबर लढतील.
भारतीय खो- खो महासंघ व महाराष्ट्र खो- खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा ऍमॅच्युअर खो- खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली 32 वी किशोर- किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो- खो स्पर्धा येथील घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात सुरू झाली असून ही स्पर्धा उद्यापर्यंत आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी डावाने विजय मिळविण्याचा धडाका कायम ठेवला आहे.
मंगळवारी सकाळी झालेल्या किशोरांच्या सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर 23-5 असा शानदार विजय मिळविला. आशिष गौतम याने आपल्या धारदार आक्रमणात 7 गुण मिळवले. हाराद्या वसावे ( 5.00 मि. संरक्षण व 2 गुण), राज जाधव ( 1.50 मि. संरक्षण व 5 गुण) व सोत्या वळवी (2.40 मि. संरक्षण व 3 गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. महाराष्ट्राच्या किशोरींनी आंध्र प्रदेशचाच 19- 3 असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या धनश्री कंक (5.20 मि. संरक्षण व 2 गुण), स्वप्नाली तामखडे (3 मि. संरक्षण व 2 गुण) व मैथली पवार (2 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी संघाच्या विजयात अष्टपैलू कामगिरी केली. संचिता गायकवाडने 4 गुण मिळवले. मोनिकाच्या अष्टपैलू खेळामुळे विदर्भाच्या मुलींनी हरियाणावर 13- 11 अशी 3.50 मिनिटे राखून मात केली. कोल्हापूरच्या मुलांनी उत्तराखंडवर 12- 9 असा डावाने शानदार विजय मिळविला. त्यांच्या आयानने 2.20 मिनिटे पळती तर सिद्धेशने 3 गडी बाद करीत 1.20 मिनिटे संरक्षण केले.
अन्य उपउपांत्यपूर्व निकाल : मुले : उत्तर प्रदेश वि. वि. विदर्भ 15-13 पाच मिनिटे राखून, केरळ वि. वि. छत्तीसगड 15- 13 पन्नास सेकंद राखून, कर्नाटक वि. वि. पॉंडिचेरी 16- 14, पश्चिम बंगाल वि. वि. झारखंड 22- 9, हरियाणा वि. वि. मध्य भारत 13- 5 डावाने, राजस्थान वि. वि. दिल्ली 22- 18.
मुली : दिल्ली वि. वि. ओरिसा 17- 3 डावाने, राजस्थान वि. वि. केरळ 9- 8 साडेचार मिनिटे राखून, गुजरात वि. वि. उत्तर प्रदेश 16- 7, तामिळनाडू वि. वि. कोल्हापूर 6- 5 साडेपाच मिनिटे राखून, कर्नाटक वि. वि. छत्तीसगड 9- 5 डावाने, पश्चिम बंगाल वि. वि. पॉंडिचेरी 19- 17.