दारु आणि पार्ट्या दिल्यास मतदानावर बहिष्कार; महिला मंडळे आक्रमक

0

वर्धा : निवडणुका म्हटलं की दारु आणि मटण पार्ट्या आल्याच. मात्र या असल्या प्रथा बंद पाडण्यासाठी थेट महिला मंडळेच उतरली आहेत. जर गावात दारु आणि मटणाच्या पार्ट्या दिल्या तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय वर्धा जिल्ह्यातील महिलांनी घेतला आहे.

राज्यातील १४ हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. मटण, दारूचे आमिष दाखवून निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात सर्वोदयी नेते भाई रजनीकांत म्हणाले, युवकांना व्यसनी केले जात आहे. म्हणून निवडणूक क्षेत्रात दारू विक्रीवर नियंत्रण असावे, गावात पोलिसांचा पहारा असावा, धाब्यांवर नियमबाहय़ दारू विक्री होणार नाही, रात्री मुदतीबाहेर दुकाने चालू राहणार नाहीत, अशी विनंती शासनाला केली आहे. ‘जे पाजतील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवारांना ‘नोटा’ मारू’, पक्ष पाजतील दारू तर त्यांना मतदान ना करू, घेऊन आलात दारू तर त्याला नक्कीच पाडू, अशा घोषणा महिला मंडळतर्फे  गावोगावी दिले जात आहेत.

१५ दिवसांत आठशे रुपयांची दारू पाजून पाच वर्षे स्वत:चे घर भरणारा सरपंच गावाचे वाटोळेच करणार. ग्रामसेवक कशावर सह्या घेतो, हेदेखील भान न ठेवणारा सरपंच काय कामाचा? खर्च करू द्या, पण अशा उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन महिला करत आहेत.

दारूमुक्ती आंदोलनातील यवतमाळचे रवी गावंडे, राज्य संघटिका रत्ना खंडारे (अकोला), बुलढाणा येथील अ‍ॅड. रत्नमाला गवई, माया धांडे, साताऱ्याच्या शालिनी वाघमारे, अहमदनगरचे देवराव अंबोरे व अ‍ॅड. रंजना गवांदे, येळाकेळीच्या पुष्पा झाडे आंदोलनाच्या अग्रभागी आहेत. गावपातळीवर दारूबंदीबाबत कारवाई करण्याचे अधिकार पोलीस पाटील यांना असतात. ते दारू जप्त करू शकतात, झडती घेऊ शकतात. मात्र अनेक पोलीस पाटलांना त्यांचे अधिकारच माहीत नसल्याने त्यांना प्रशिक्षण देण्याची विनंती आंदोलकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे येळाकेळीला आले असता त्यांना पुष्पाताईंनी दारूबंदीचे काय, असा थेट सवाल केला. आम्ही दारू विक्री हाणून पाडतो, मात्र आमच्यावरच कारवाई होते. गावठी दारूचा प्रश्न तर आहेच. पण जिल्हय़ात तयार न होणारी विदेशी दारू पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय विकली जावूच शकत नाही, असा थेट आरोप मंत्र्यांकडे केला. जळगाव जामोद परिसरातील १५ गावात माया धांडे यांनी निवडणूक काळात दारू विक्री न करण्याची तंबीच दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.