लाच प्रकरण : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष एसीबीच्या रडारवर

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील लाच प्रकरणात 2018 पासूनचे स्थायी समिती माजी अध्यक्षांची एसीबी चौकशी करणार आहे. ज्या जाहिरातदार व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार केली, ते प्रकरण 2018 पासून निर्णयाविना प्रलंबित होतं. म्हणूनच एसीबीने तक्रारदाराशी संबंधित 2018पासूनची सर्व कागदपत्रे हाती घेतली आहेत. त्याअनुषंगाने 2018 ते 2020 या दरम्यानच्या तिन्ही माजी अध्यक्षांची कधीही चौकशी होऊ शकते. तशी माहिती एसीबीकडून प्राप्त झाली आहे. सध्या स्थायी समितीच्या उर्वरित पंधरा सदस्यांची चौकशी सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत 18 ऑगस्टला एसीबीने सापळा रचला. हा सापळा स्थायी समितीच्या कार्यालयाभोवती होता. पाच तास दबा धरून बसलेल्या या पथकाच्या जाळ्यात मोठा मासा अडकला. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि चार कर्मचाऱ्यांना एसीबीने रंगेहाथ अटक झाली. न्यायालयाने या पाच ही जणांची रवानगी पोलीस कोठडीत केली. चौकशीत एसीबीच्या हाती एक ऑडिओ क्लिप लागली. तक्रारदार जाहिरात व्यावसायिक आणि मुख्य लिपिक तथा स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळेचा यात संवाद होता.

संवादात ठरलेली लाच ही सोळा व्यक्तींना द्यावी लागते, असा उल्लेख होता. या सोळा व्यक्ती म्हणजे स्थायी समितीचे सोळा सदस्य असल्याचा दावा एसीबीने न्यायालयात केला. अध्यक्ष नितीन लांडगे यांची चौकशी आधीपासून सुरूच होती. त्यामुळे उर्वरित पंधरा सदस्य एसीबीच्या रडारवर आले. यात भाजपचे नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेना एक आणि भाजप संलग्न एक अशा पंधरा सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना 22 सप्टेंबरला एसीबीने नोटिसा धाडल्या. 29 सप्टेंबर पर्यंत त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश आहेत.

तक्रारदार जाहिरातदार व्यावसायिकाचे हे प्रकरण 2018 पासून निर्णयाविना प्रलंबित होते. त्यामुळेच एसीबीने 2018 पासूनचा तपास करायला सुरुवात केलीये. यासाठी एसीबीने तक्रारदाराशी संबंधित 2018 ते 2021 या काळातील सर्व कागदपत्रे हाती घेतली आहेत. त्याअनुषंगाने ‘ते’ तीन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आता एसीबीच्या रडारवर आले आहेत. त्यांना कधी ही चौकशीला बोलावलं जाऊ शकतं. सध्या स्थायी समितीच्या ‘त्या’ पंधरा सदस्यांची चौकशी सुरू आहे, त्यापैकी बारा सदस्यांनी एसीबी कार्यालयात जाऊन जवाब दिला आहे. उर्वरित तिघांपैकी भाजपचे रवी लांडगे यांनी निवडीनंतर पहिल्याच दिवशी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची चौकशी होणार नसल्याचं एसीबीकडून सांगण्यात येतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.