बंबल, टिंडर सारख्या डेटिंग साईटवरुन ‘रिलेशन’ बनवताय…थोडं थांबा

0

पिंपरी : सोशल मीडियावर तरुण-तरुणींना एकत्र येण्यासाठी अनेक साईट सुरु आहेत. यातून अनेकांची फसवणूक, अत्याचार केल्याचे प्रकार समोर आले आहेत. अश्यातच बंबल, टिंडर या डेटिंग साईटद्वारे युवकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लुबाडणाऱ्या एका तरुणीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीने वर्षभरात तब्बल 16 युवकांना जाळ्यात अडकवून लुबाडले आहे.

सायली देवेंद्र काळे (27, रा. साधू वासवानी रोड, पुणे) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.10 डिसेंबर 2020 रोजी रावेत येथील एका युवकासोबत त्याच्या घरी येऊन त्याच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी शक्कल लढवली. पोलिसांनी तिचाच फंडा वापरून तिला पकडण्याचा प्रयत्न सुरु केला.
चेन्नई येथील तरुणाची आणि आरोपी तरुणीची बंबल या डेटिंग ॲपवरून मैत्री झाली असल्याने पोलिसांनी बनावट प्रोफाइल तयार केले. बंबल या डेटिंग ॲपमध्ये शोध सुरु केला. अखेर तिची प्रोफाइल सापडली आणि पोलिसांनी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. बरेच दिवस तरुणीने पोलिसांच्या बनावट प्रोफाइलला प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, आरोपी तरुणीने चेन्नई येथील एका तरुणाला डेटिंग साईटच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला पुण्यात भेटायला बोलावले. वाकड येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ते दोघेही राहिले. दरम्यान तरुणीने तरुणाला आग्रहाने सॉफ्टड्रिंक पाजले. त्यातून तिने तरुणाला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण एक लाख 50 हजारांचा मुद्देमाल घेऊन हॉटेलमधून पळ काढला.

याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. देहूरोड आणि वाकड येथे झालेल्या दोन्ही गुन्ह्यांची पद्धत एकच असल्याने हे प्रकरण उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी गुन्हे शाखा युनिट चारकडे सोपवले.

गुन्ह्याचा तपास करताना ज्या तरुणीच्या प्रोफाइलवर पोलिसांच्या बनावट अकाउंटवरून रिक्वेस्ट पाठवल्या होत्या, त्यातील एका प्रोफाइलची रिक्वेस्ट तरुणीने स्वीकारली. त्यातून पोलिसांनी तिच्याशी संवाद वाढवून तिला भूमकर चौक येथे तिच्या वेळेनुसार भेटायला बोलावले. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तीच आरोपी तरुणी असल्याचे निष्पन्न झाले. तिला अटक करून वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही तरुणी मूळ पुण्यात राहत नसलेल्या युवकांना शोधून त्यांच्याशी संपर्क साधायची. त्यांना बाहेर भेटायला बोलावत. त्यानंतर त्यांना लॉजवर अथवा घरी नेण्यास सांगून त्यांच्या पेयांमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून बेशुद्ध करायची. संबंधित तरुण बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन चोरून न्यायची.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, पोलीस अंमलदार प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, स्वाती रुपनवर, वैशाली चांदगुडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तृंगार, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.