कर्ज मंजुरीच्या नावाखाली फसवणूक करणारे बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात

0

पुणे : कर्ज मंजुरीच्या बहाण्याने 12 लाख 30 हजारांची फसवणूक करून फरार झालेल्या बंटी-बबलीला स्वारगेट पोलिसांनी गुजरातमधील सुरत शहरातून अटक केली.

दोघांनी शहरात मायक्रो फायनान्स नावाची बनावट संस्था स्थापन करून 100 ते 150 जणांची कर्ज मंजुरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. दिपाली जितेंद्र पौनिकर (32), हेमराज जीवनलाल भावसार (28, दोघे रा. सार्थक सोसायटी, सिंगनपूर, सुरत, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, दिपाली आणि हेमराज यांनी स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरात एका इमारतीत मानधन मायक्रो फायनान्स नावाची बनावट वित्तीय संस्था सुरू केली. गुलटेकडी भागातील कष्टकरी-कामगार वर्गातील अनेकांना त्यांनी त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याची बतावणी केली होती. त्यानंतर दोघांनी कर्ज मंजुरीच्या आमिषाने पैसे उकळले होते. कर्ज मंजूर न करता त्यांनी कार्यालय बंद करून पोबारा केला होता.

दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, तांत्रिक विश्लेषणाद्वारे दोघे गुजरात येथील सुरत शहरात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, फिरोज शेख, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, संदीप घुले यांच्या पथकाने दोघांना सुरत येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघांना पकडण्यासाठी स्वारगेट पोलिसांचे पथक तब्बल दोन महिन्यांपासून त्यांच्या मागावर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.