पुणे : मोक्कानुसार दोनदा कारवाई झालेल्या औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश यांना न्यायालयाने २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मोक्का न्यायालयाने न्यायाधीश ए. एन. शिरशीकर यांनी हा आदेश दिला.
पुणे पोलिसांनी त्यांना बुधवारी रात्री कर्नाटक येथून अटक केली आहे. त्यानंतर दोघांना आज येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांच्याविरूध्द सुनेच्या छळ केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात देखील गायकवाड बाप-लेकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे देखील त्यांच्यावर दाखल आहेत.
नानासाहेब गायकवाड, त्याचा मुलगा व कुटुंबाविरुद्ध त्यांच्या सुनेने कौटुंबिक छळाचा गुन्हा चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल केला होता. त्यांच्या आमदार होण्यामध्ये सुनेचा अडथळा ठरत असल्याचे एका उच्चभ्रू आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून त्यांनी सुनेचा छळ करण्याबरोबरच तिच्यावर अघोरी विद्येचा प्रयोग केला होता. या घटनेनंतर गायकवाड कुटुंबाविरुद्धच्या अनेक प्रकरणांना वाचा फुटली होती.