पुणे : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होईल. तर लवकरच निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. मविआचे नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे पिछाडीवर आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत.
कसबा व चिंचवड या दोन्ही मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत आहे. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भाजपला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला असून त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आजचा निकाल महत्त्वाचा मानला जातोय.
दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना आणि भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच पोटनिवडणुक आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लगले आहे.