मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहे.
या दौऱ्यात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांची बैठक होणार आहे. राज्यातील विकास कामांबाबतही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसंच मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्नही मार्गी लागण्याची चिन्ह आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येऊन गेले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीला पोहोचले आहे. त्यामुळे भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर 19 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. शिवसेनेचं पक्षचिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला अजून निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. तर सुप्रीम कोर्टामध्येही सुनावणी सुरू आहे.