बाणेर-बालेवाडी येथील महापालिकेच्या जागेवर उभारणार ‘कॅन्सर हॉस्पीटल’
पुणे : खाजगी संस्थेच्या सहकार्याने बाणेर- बालेवाडी येथील महापालिकेच्या जागेवर बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर ७०० कोटी रुपये खर्चून कॅन्सर हॉस्पीटल उभारण्यासाठी राज्य शासनाकडील विविध विभागांच्या परवानग्या घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
यामध्येही मुखाचा, अन्न नलिका, जठर, फुफ्फुस, प्रोस्टेट या अवयवांचा कॅन्सर तसेच महिलांमध्ये स्तनांचा व गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. शहरातही कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असताना त्यावर उपचार करण्यासाठी महापालिकेचे एकही रुग्णालय नाही.
बाणेर- बालेवाडी येथे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर ३ लाख ७७ हजार चौ. फुटाचे बांधकाम करून हॉस्पीटलची इमारत उभारणे, इंटेरियर व फर्निचरसह सर्व यंत्र सामुग्री उपलब्ध करून देणे व कुशल मनुष्यबळ पुरविणे यासाठी ७०० कोटी रुपये इतका खर्च आहे.
महापालिकेकडे निधीची कमतरता असल्याने बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर हे हॉस्पीटल उभारण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या परवानग्या, ना हकरत दाखले घेणे आणि निविदा मागविणे यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. निविदेत पात्र ठरणार्या संस्थेला कर्ज उभारताना महापालिका हमी घेईल तसेच प्रकल्प राबविण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे