पिंपरी : महाविकास आघाडीतून उमेदवारी डावलल्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वाकडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेवून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर कलाटे यांनी मोरया गोसावी महाराज यांचे दर्शन घेतले.
थेरगाव येथील ग प्रभाग कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेविका मीनल यादव, अश्विनी वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि शिवसेनेचे राहुल कलाटे ही दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. वाकड येथून मोठी रॅली काढत कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.