नवी मुंबई : राज्यभरात जाळे पसरलेल्या कारचोरांना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 13 कारसह 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीच्या चौकशीतून आतापर्यंत 24 गुन्ह्यांची उकल झाली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचं नाव तौफिक हबिबूला खान उर्फ मनोज गुप्ता असं आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 14, ठाणे पोलीस आयुक्तालयात 5, मीरा भाईंदर 2, मुंबई 1, पिंपरी चिंचवड 1, राजस्थान 1 असे वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. तर आरोपीकडून मारुती, स्विफ्ट डिजायर, सियाज, हुंदाई 120, फॉर्चूनर, इनोव्हा अशा एकूण 81 लाख 80 हजर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहमद तौफिक हबिबूला हा सराईत वाहन चोर आहे. त्याने अलीबाबा डॉट कॉम या संकेतस्थळावरुन 65 हजार किंमतीचे टूलकिट विकत घेतले होते. या टूलकिटचा वापर करुन बीएमडब्ल्यू, फॉरच्युनर, हुंदाई अशा परदेशी कंपन्यांची कोणतीही गाडी असो तो दहा मिनिटात चोरी करत असे.
आरोपी पार्क असणाऱ्या कारचे दरवाजाचे काच फोडून दरवाजा उघडायचा. नंतर कारचे टूल बॉक्स ओपन करुन डी. सी. एम सर्किट डिस्कनेकट करायचा. त्यानंतर कारचे बोनट ओपन करुन सायरन मोड डिस्कनेकट करायचा. नंतर पुन्हा कारमध्ये जाऊन ओ. सी. एम सर्किट बनवायचा. त्यानंतर पुन्हा कारखाली उतरुन एक्सटर्नल वायरने बॅटरी ते फ्युज बॉक्स जोडायचा. त्यानंतर आधुनिक पद्धतीच्या टॅब वापरुन त्यास वायफाई कनेक्ट करुन वाहनांची स्विच ऑन/ऑफ कि वर चाबी ठेऊन कोड, डिकोड करायचा.
यातून तो डुप्लिकेट चावी बनवायचा. नंतर एक्सटर्नल नट बॉक्स आणि बॅटऱ्या जोडलेले वायर काढायचा. नंतर डुप्लिकेट चावीने गाडी सुरु करुन वाहन चोरी करत असे. शिवाय या चोराला कोणत्याही परदेशी कंपनीची गाडी चोरी करणे सहज शक्य आहे. तसे तंत्रज्ञान तो वापरात असे.
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रविणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा, कक्ष 1, नवी मुंबईचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, पोलीस मामलेदार शशीकांत जगदाळे, पोलीस शिपाई जालींदर गायकर, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम, पोलिस नाईक निलेश किंद्रे, पोलिस नाईक भांगरे व पोलिस शिपाई संतोष मिसाळ यांनी ही कामगिरी पार पाडली.