माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह दोघांवर गुन्हा
करोडो रूपयांची फसवणूक; डोक्याला पिस्तुल लावत जीवे मारण्याची धमकी
पिंपरी : पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर परिसरात मोठे राजकीय वर्चस्व असणारे, पुणे जिल्हा परिषदचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. व्यवसायिकाची 1 कोटी 38 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा हा प्रकार आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड मधील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी हर्बन्ससिंग जब्बाल (72, रा. सेक्टर 27अ, प्राधिकरण निगडी) यांनी फिर्यादी दिली आहे. तर मंगलदास विठ्ठल बांदल (47, रा. शिक्रापूर) व रवींद्र सातपुते (रा. आकुर्डी) या आरोपीच्या विरोधात भा. द. वी कलम 406, 420, 506(2), 34 सह आर्म ऍक्ट कलम 3(25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदल आणि सातपुते या दोघानी संगनमत करून जब्बाल यांच्या यापिशिका कंपनीच्या विक्रीपोटी मिळालेल्या 1 कोटी 38 लाख रुपयांचा धनादेश संमतीशिवाय शिवाजीराव भोसले बँकेतील यापिशिका कंपनीच्या खात्यात जमा केला. त्यानंतर जब्बाल यांच्या संमतीशिवाय त्यांनी स्वाक्षरी केलेल्या दोन कोऱ्या धनादेशाचा गैरवापर करून बांदल आणि सातपुते यांच्या मित्रांच्या कर्जखात्यात सदरचे पैसे वर्ग करून जब्बाल यांची फसवणूक केली.
फसवणूक झाल्याने जब्बाल यांनी पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रारी अर्ज दिला. यावरून चिडून बांदल आणि सातपुते यांनी शिवाजीराव भोसले बँक येथे जब्बाल यांच्या डोक्यास पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आमचा वाद मिटला असून तक्रारी अर्ज माघारी घेत आहे, अशा पत्रावर जब्बाल यांची जबरदस्तीने सही घेतली.
या सगळ्या प्रकाराबाबत जब्बाल यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मंगलदास बांदल हे राजकारणात एकेकाळी तोफ होती. सर्वच पक्षाशी त्यांची जवळीक होती. मात्र त्यांच्यावर आर्थिक घोटाळा व इतर गुन्हे दाखल झाल्याने पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात त्यांच्याविरुद्ध हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस करत आहेत.