गद्दार दिन साजरा करा; मस्तीचा फुगा लवकर फुटणार : उद्धव ठाकरे

0

मुंबई : आमदार, खासदार तोडून सत्ता स्थापन केली. हे लाचार मिंधे सत्ता आणि खोक्यासाठी तिकडे गेले. मात्र, कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. उद्या आपल्या पक्षाचा वर्धापन दिन आहे, तर परवा जागतिक गद्दार दिन आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटातर्फे वरळीतील एनएससीआय या ठिकाणी आयोजित शिबिरात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव म्हणाले की, २०१४ मध्ये बोलताना मी म्हणालो होतो की, अफजल खानाची फौज येणार. तेव्हा लोक म्हणाले, काय म्हणताय? त्यांना आज कळले असेल अफजल खान कसा आहे. कितीही शाह आणि अफजलखान चाल करून आले तरी कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत असल्यामुळे मला कसलेही टेन्शन नाही. तुम्ही स्वत: कोणावर हात उचलू नका, पण जर कोणी तुमच्यावर हात उचलला तर हात तोडून वेगळा करा, असे अयोध्या पौळवरील हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितले.

देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आमची एकजूट ही विरोधकांची नाही तर देशप्रेमींची आहे. म्हणून मी पाटणाच्या बैठकीला जाणार आहे.

तुमची सत्तेची मस्ती हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावे. तुमची मस्ती उतरवण्यासाठी काही वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी मोदींना दिला.

तुम्हाला कोणी अदानींवर प्रश्न विचारला तर तुमची बोबडी वळते. तुम्ही राहुल गांधींना घराबाहेर काढता आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार का? असा टोला अमित शाह यांना लगावला.

केंद्र आणि राज्य सरकारकडून ऊठसूट लुटालूट सुरू आहे. सरकारकडून मुंबईची लूट सुरू आहे. जाहिरातीमध्ये बापच बदलला होता. दुसऱ्या दिवशी सर्वांचे फोटो टाकले, असा टोला शिंदेंना लगावला.
‘ना घर का ना घाट का’ अशी देवेंद्र फडणवीस याची अवस्था झाली आहे. कर्नाटकात बजरंगबलीची घोषणा देऊनही खुर्चीला आग लागली. कारण जनतेला तुमचे खरे रूप माहिती झाले आहे. तुम्ही भांडणे लावून एकदा निवडणूक जिंकू शकता, मात्र असे नेहमी हाेणार नाही.

जोपर्यंत आपली इच्छा असेल तोपर्यंत आपण महाविकास आघाडीत राहू, राजकारणात काहीही होऊ शकते, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. मुंबईवर कब्जा करण्यासाठी दिल्लीहून येतात. मात्र, मुंबई मराठी माणसाची असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. मुंबईला महापौर नसेल तर शोभा नाही. मुंबई, नागपूर आदी शहरांना महापौर नाही. महापौर म्हणजे कपाळावरील कुंकू आहे. तुम्ही आमचे कुंकू पुसले, असा आरोपदेखील खासदार संजय राऊत यांनी केला. ज्यांनी आमचा छळ केला, त्याची व्याजासह परतफेड करणार आहोत.

अकोला |‘उद्धव ठाकरे माझ्या अवस्थेबद्दल बोलतात. मात्र उद्धवजी तुमची कुठे-कुठे आणि कशी आग होते, हे आम्हालाही ठावुक आहे,’ असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे झालेल्या महाजनसंवाद सभेत केला. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या शिबिरात ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था फडणवीसांची झाल्याचे म्हटले. तर रविवारी अकोला येथील अकोला क्रिक्रेट क्लबवर झालेल्या जाहीर सभेत फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचे भाषण लिहून देणारे शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे उधारीवर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ‘स्क्रिप्ट रायटर’ आणलेला दिसतो. उद्धव ठाकरेंना जेव्हा कोणत्या नेत्याची भीती वाटते, तेव्हा ते सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.