मुंबई : पोलिस व्हॅनमध्ये एका गुंडाने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटनाउल्हासनगरमध्ये समोर आली आहे. एका हत्येच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या गुंडाने व्हॅनमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला. रोशन झा असे या गुंडाचे नाव असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
रोशन झा हा उल्हासनगरमधील गुंड आहे. त्याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकवणेआणि इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी या गुंडाला कारागृहातून कल्याण न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेल्या गुंड रोशनने हातात हातकडी असतानाही खिडकीमधून समर्थकांनी आणलेला केक कापला.
हा व्हिडिओ त्याच्या समर्थकांनीही आपल्या व्हाॅट्सअॅप स्टेटसवर ठेवला. व्हॅनमध्ये गुंड केक कापत होता. मात्र, पोलिसांनी त्याला मज्जाव का केला नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हत्येच्या आरोपातील आरोपीने पोलिसांच्याच गाडीत वाढदिवस साजरा केल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर पोलिसांनी चौकशी सुरू केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.