नवी दिल्ली ः उत्तरप्रदेशमधील गाजियाबाद जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे. मुरादाबाद स्मशानभूमीचे छत कोसळून १७ जण ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला. बचावकार्य सुरू असून ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आलेले आहे.
या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात त्वरीत दाखल करण्यात आले. दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या कडक कारवाई केली जाईल, असे विभागीय आयुक्त अनिता मेश्राम यांनी सांगितले आहे. घडलेली घटना अशी की, “अंत्यसंस्कारासाठी लोक आले होते. पाऊस आल्याने लोक स्मशानभूमीच्या छताखाली उभे राहिले होते. तेवढ्यात सर्वांच्या अंगावर छत कोसळले आणि पडलेल्या छताखाली लोक दबले गेले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफची टीम त्वरीत दाखल झाली आणि तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे. यामध्ये ३८ जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेले आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुखः व्यक्त करत सांगितले की, “मी जिल्हा अधिकार्यांना मदतकार्य राबवण्याच्या व घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घटनेतील पीडित व्यक्तींना सर्वतोपरी मदत केली जाईल”, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.