नवी दिल्ली ः केंद्र सरकारने करोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला ऑर्डर दिली आहे. सरकारने सीरमकडून ‘कोविशिल्ड’ लसींचे १ कोटी १० लाख लस खरेदी करणार आहे. आज दुपारी केंद्राकडून लस खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसाची किंमत २१० रुपये असणार आहे, अशी माहिती सीरमच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले आहे.
सीरमच्या अधिकऱ्याने सांगितले की, सोमवारपासून लसीची डिलिव्हरी पाठविण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला ६० ठिकाणी कोविशिल्ड लस पाठविण्यात येणार आहे. तिथून अन्य ठिकाणी लसीचे वितरण होईल, असेही वृत्त मिळत आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लसदेखील केंद्राकडून खरेदी करार करणार आहे.
१६ जानेवारीपासून देशात करोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी आणि कोविडयोद्ध्यांना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना आखण्यात आली आहे.