नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून ३०० सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार १ ऑक्टोबरपासून लेबर कोड म्हणजेच कामगार संहितेचे नियम लागू करू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या २४० हून ३०० पर्यंत वाढू शकतात, असे सांगितले जात आहे.
केंद्र सरकार १ एप्रिल २०२१ पासून नवीन कामगार संहितेतील नियम लागू करणार होती, पण काही राज्यांची तयारी नसल्यामुळे आणि एचआर पॉलिसी बदलण्यासाठी वाढीव वेळ दिल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले.
लेबर कोडमधील नियमांत बदल करण्याबाबत कामगार मंत्रालय, कामगार संघटना आणि उद्योग जगतातील प्रतिनिधी यांच्यात चर्चा करण्यात आली.
१ जुलैपासून नवे नियम लागू करण्यात येणार होते, पण राज्यांनी पुन्हा वेळ वाढवून मागितली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपर्यंत २०२१ वेळ वाढविण्यात आला आहे. आता कामगार मंत्रालय आणि मोदी सरकार कामगार संहितेचे नियम १ ऑक्टोबरपासून लागू करण्याची शक्यता आहे. कामाचे तास, वार्षिक सुट्ट्या, पेन्शन, पीएफ, टेक होम सॅलरी, सेवानिवृत्ती या घटकांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी अर्जित रजांमध्ये २४० वरून ३०० पर्यंत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, हे नियम आणि कामगार संघटनेच्या मागण्यांना सरकारने हिरवा कंदील दाखवला तर, १ ऑक्टोबर २०२१ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना ३०० अर्जित रजा मिळू शकतात. ऑगस्ट २०१९ मध्ये संसदेने लेबर कोड इंडस्ट्रीयल रिलेशन, कामाची सुरक्षा, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन आणि सामाजिक सुरक्षिततेशी संबंधित नियमांमध्ये बदल केले. हे नियम सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर करण्यात आले होते.