सातारा, दहिवडी येथे दरोडा टाकून फरार असणारा अडकला चाकण पोलिसांच्या जाळ्यात
सोनारावर गोळ्या झाडून ३३ लाखांचा ऐवज लुटला
पिंपरी : सोनारावर गोळ्या झाडून, दरोडा टाकून ४० तोळे सोने, ३० किलो चांदी आणि तीन लाख रुपये लंपास करुन फरार असलेल्या दरोडेखोरास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तीन महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील मालवडी गावात घडली होती.
अमर राजकुमार राठोड (२५, रा. काळूस, ता.खेड, जि. पुणे) याला अटक केली आहे. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील मालवडी गावात अमर आणि त्याच्या साथीदारांनी दरोडा टाकला. तेथील सोनारावर गोळ्या झाडून ४० तोळे सोने, ३० किलो चांदी आणि तीन लाख रुपये लंपास केला. दरोडा टाकल्यापासून दहिवडी, सातारा पोलीस, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्या मागावर होते.
पोलिसांना चकवा देत राठोड हा गुजरात, मध्यप्रदेश राज्यात फिरत होता. राठोड हा चाकण परिसरात आला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याच्या तपासी पथकातील पोलीस नाईक भैरोबा यादव यांना मिळाली. यादव यांनी वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांना दिली. त्यानंतर सापळा रचून राठोड याला अटक करण्यात आलेली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिंगारे, अनिल देवडे, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, राजू यादव, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, निखिल शेटे, सुदर्शन बर्डे, भैरोबा यादव, नितीन गुंजाळ, निखिल वरपे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, सुनील भागवत, चेतन गायकर या पथकाने केली आहे.