वादग्रस्त वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी

0

मुंबई : भिकेच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले, कर्मवीर आपल्या रक्तारक्तात असल्याचे ते म्हणाले.

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पैठण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचालित संतपीठाच्या पहिल्या प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला. यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडेलय.

केवळ सरकारी अनुदानावर विसंबून राहू नका, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संस्थांना केले. ते म्हणाले की, देशात सध्या सर्व सरकारनेच करावे, अशी भावना निर्माण झालीय. यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनी शाळा काढल्या. त्यासाठी सरकारी अनुदान घेतले नाही. भीक मागून शाळा उभ्या केल्या, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवतेय. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. औरंगाबादमध्ये प्रकरणी आंदोलनही करण्यात आले.

मंत्री चंद्रकांत पाटील काल वक्तव्यावर ठाम होते. वाद निर्माण झाल्यानंतरही त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याची भूमिका मांडली. ते म्हणाले, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांना अॅप्रिशियट करतोय. ते सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. त्याला आताच्या शब्दांत वर्गणी म्हणू. सीएसआर म्हणू. मात्र, तेव्हा भीक मागितली म्हणायचे. सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहता?, असे म्हणायचे असल्याचे सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केल्यानंतरही वाद शमला नाही. त्यामुळे त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, भीक शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. माझ्या रक्तारक्तात आंबेडकर, फुले, आहेत. मी छोट्या मनाचा नाही. तुम्ही छोट्या मनाचे आहात. माझी क्लिप पुन्हा एकदा ऐका. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.