सोमय्या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी पडू नये; अन्यथा कपडे फाटतील
सोमय्यांची 211 प्रकरणे; त्यांनी खुशाल कोर्टात जावे
मुंबई: किरीट सोमय्यांनी पवईतील पेरूबाग येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे 300 ते 400 कोटींचा घोटाळा केला आहे. त्याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आहेत. चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात पडू नये. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. सोमय्यांची एकूण 211 प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. त्यांनी एकूण सात साडेसात हजार कोटींचा हा घोटाळा केला आहे. त्यांनी खुशाल माझ्याविरोधात कोर्टात जावं, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
महाआयटी घोटाळ्यातील काही प्रमुख लोकांना पळवून लावल्याची माझी माहिती आहे. अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू. 25 हजार कोटींचा हा घोटाळा आहे. त्याचे मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. ईडी ऐकत असेल तर मी पुन्हा सांगत आहे. आम्ही हा घोटाळा बाहेर काढणार होतो, तेव्हाच ते पळून जाण्याच्या तयारीत होते, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
मी जुहूच्या प्लॉटबाबत बोललो होतो. तेही बाहेर येईल. पवईचे मला भेटले. किरीट सोमय्यांच्या हातात चप्पल आहे. तेच स्वत:ला चप्पलेने मारतील. महाराष्ट्रातील लोक त्याची धिंड काढतील. तो पुढे लोकं मागे, तो पुढे लोक मागे असं चित्रं निर्माण होईल. कपडे काढून त्याची धिंड काढणार आहे, असा इशाराही त्यांनी केला.
पेरुबाग पास्कोली येथे 138 एकरचा भूखंड आहे. त्याने साफ केला. पुनर्वसनाच्या नावाखाली 433 बोगस लोकांना आत घुसवले. किरीट सोमय्यांच्या एजंटांनी या पुनर्वसन प्रकल्पात बोगस लोकांना आत घुसवले. माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. ओरिजनल व्हिक्टीम आहेत, त्यांना धमकावले आहे. पवई पेरुबागच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पावर फडणवीसांनी सही केली. फडणवीसांना हा घोटाळा माहीतही नसेल. सोमय्या आणि त्यांच्या एजंटांनी 433 लोकांकडून प्रत्येकी 25-25 लाख रुपये घेतले. म्हणजे 200 ते 300 कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि ईडी ऐकत असेल तर त्यांनी पहावं, असं ते म्हणाले.