YCM रुग्णालयातील व्यवस्था बदला : आमदार बनसोडे
“रुग्णसेवा व प्रशासन आणि शिक्षण विभाग वेगळे करून प्रमुख जबाबदारी उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवा आमदार बनसोडे यांची मागणी ”
पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मृतदेह अदलाबदलाच्या प्रकारामुळे रुग्णालयातील भोंगळ कारभार नुकताच चव्हाट्यावर आला आहे. कै. स्नेहलता गायकवाड या महिलेचा मृत्यू भिंत अंगावर कोसळ्याने झाला व शवविच्छेदनासाठी YCM मध्ये दाखल करण्यात आला होता. शवागृहातून या महिलेचा मृतदेह दुसऱ्याच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिला व त्या नातेवाईकांनी अदलाबदल झालेल्या मृत व्यक्तीचा अंत्य विधी उरकून टाकला. परिणामी गायकवाड महिलेच्या नातेवाईकांनी YCM रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली. अर्थात नातेवाईकांचा हा राग त्यांच्यावर झालेल्या अन्यायातून व्यक्त झालेला असुन मृतदेह अदलाबदलबाबत आमदार बनसोडे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदविला आहे.
या अनुषंगाने YCM रुग्णालयाच्याच्या आस्थापनेमध्ये बदल करण्याबाबत आमदार बनसोडे यांनी सुचविले आहे. त्यामध्ये रुग्णालय सेवा पदव्युत्यर शिक्षण संस्था, प्रशासन व निविदा विषयक कामकाज असे विभाग करण्यात यावेत व रुग्णालय सेवा हा विभाग वैद्यकीय अधिक्षकांकडे देण्यात यावा व पदव्यूत्यर शिक्षण संस्थेचा कारभार YCMH अधिष्ठता यांच्याकडे तसेच प्रशासन व निविदा विषयक कामकाज करणे आणि YCMH मधील संपूर्ण जबादारीसाठी उपआयुक्त दर्जाचा अधिकारी नेमून यांच्याकडे देण्यात यावी. उपआयुक्ताने अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांचे नियंत्रणाखाली कामकाज करावे, असा बदल करण्याची मागणी बनसोडे यांनी निवेदन द्वारे केली आहे.
उपआयुक्त दर्जाचा अधिकारी नेमल्याने YCM रुग्णालयातील रुग्णसेवा शिक्षण व प्रशासन कारभार गतिमान होऊन नागरिकांना चांगली सेवा मिळू शकेल अशी अपेक्षा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच शहरातील किरकोळ आजाराचे रुग्ण YCM येथे OPD साठी येत असुन गर्दी होत आहे व परिणामी स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी OPD साठी आलेल्या नागरिकांना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे.
सध्या शहरात २९ दवाखाने व ८ मोठी रुग्णालये आहेत. मनपा दवाखाण्यातील कारभार योग्य नसल्याने अथवा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने रुग्ण थेट YCM रुग्णालय गाठतात व या ठिकाणी उपचारासाठी धावपळ करतात. मनपा प्रशासनाने २९ दवाखाण्यातील सेवा तपासणी करावी व जनजागृती करून मनपा दवाखाण्यातील सेवांबाबत नागरिकांना माहिती देण्यात यावी, अशीही मागणी केली आहे.
सध्या YCM रूग्णालयासह सर्व दवाखाने तसेच रुग्णालये या ठिकाणी रुग्णास केस-पेपरसाठी किंवा आंतररुग्ण सेवेसाठी आकारलेले बिल हे रोख स्वरुपात भरावे लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. म्हणून करसंकलन विभागा प्रमाणे (ऑनलाईन भरणा करण्यासाठी) केसपेपर व इतर रुग्णालयीन सेवा ऑनलाईन करण्यात यावी, अशी मागणी देखील आमदार बनसोडे यांनी आयुक्त शेखर सिंग यांचेकडे केलेली आहे.
दिवाळीचा काळ असल्याने व शहरातील नागरिक घराबाहेर पडत असुन सर्दी, खोकला, ताप, चिकनगुण्या, डेंगू यांसारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. या बाबत मात्र पालिका प्रशासानाचा नियोजन शून्य कारभार असल्याची खंत बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
याच बरोबर केसपेपरसाठी मोठी रंग रुग्णालय परिसरामध्ये दिसुन येते यासाठी केसपेपर सुविधा ऑनलाईन करण्यात यावी. ॲप विकसित करून अथवा सारथी मध्येच केसपेपर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशीही मागणी बनसोडे यांनी केली आहे.