महापालिका भांडार विभागाकडून कंपन्यांच्या हितासाठी निविदेच्या अटी शर्तीत फेरफार
आमदार अण्णा बनसोडे यांचा आरोप
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील मध्यवर्ती भांडार विभागामार्फत गैरकारभार सुरु आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सामाविष्ट रुग्ण व इतर रुग्णांकरिता शस्त्रक्रिया किंवा इतर उपचाराकरिता लागणारे इम्प्लांट साहित्य दर करार पद्धतीने खरेदी / पुरवठा करणेसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. ६ कोटी ९८ लाख ६३ हजार ७५० रुपये किमतीच्या या निविदातील अटी शर्तीमध्ये हेतुपुरस्कर विशिष्ट कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून, विशिष्ट अटी शर्तींचा समावेश भांडार विभागाने केला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत सदर निविदा स्थगित करा, अशी मागणी आ. अण्णा बनसोडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनात केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, सदर निविदेतील वैद्यकीय साहित्य हे ६ कोटी ९८ लाख ६३ हजार ७५० इतकी अंदाजित रक्कम दर्शविण्यात आलेली आहे. निविदा अट शर्त क्रमांक 8 नुसार राज्यातील कोणतीही मोठी शासकीय/ निमशासकीय वैद्यकीय संस्था अशा विशिष्ट अटी शर्ती टाकून खरेदीखत करताना दिसून येत नाही. याचा अर्थ विशिष्ट ठेकेदारांना किंवा पुरवठादारांना डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या अटी शर्ती तयार करण्याचा घाट महापालिका भांडार विभागाने केला आहे. निविदा रकमे मधील अट क्रमांक 8 मध्ये बदल केल्यास ही निविदा २ कोटी रुपयांवर येईल आणि मनपाचे सुमारे ४ कोटी रुपये बचत होतील. म्हणून वस्तुस्थिती पडताळणी होणे आवश्यक आहे. या बरोबर ज्या योजनेतील रुग्णांवर उपचारासाठी हे साहित्य वापरले जाणार आहे. त्या योजनेतील रुग्णाला राज्य शासनाकडून होणारा खर्च अदा करण्यात येत असतो. त्याच योजनेसाठी महापालिका पुन्हा कोटी रुपयांवर खर्च करून निविदा काढण्याचा नेमका हेतू काय ? याचाही अहवाल द्यावा. तरी, सदर ई-निविदा तात्काळ स्थगित करून निविदा अटी शर्ती मधील घोळ नेमका का ? व कोणी केला? याबाबत चौकशी समिती नेमून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली .
सदर निविदा अटी व शर्तीमध्ये अट क्रमांक 4 एफ व 4 जी मध्ये निविदा धारकाने मागील तीन वर्षाची उलाढाल 30 टक्के असल्याबाबत सनदी लेखापाल कडून प्रमाणपत्र आवश्यक असल्याचा उल्लेख आहे. तसेच निविदा दर पत्रक सादर करणारे निवेदन धारकाने निविदा रकमेचे किमान 30 टक्के रक्कम इतके इम्प्लांट साहित्य शासकीय-निमशासकीय रुग्णालयांना पुरवठा केल्याच्या प्रमाणपत्राची मागणी केली आहे. यासह निविदा आठ शर्त क्रमांक 8 मध्ये निविदा धारकाकडून ‘पुरविण्यात येणारे इम्प्लांट साहित्य निविदेतील स्पेसिफिकेशन नुसार आवश्यक असून युएसएफडीए व युरोपियन सिए या दर्जाचीच असणे व तसेच प्रत्येक साहित्यावर आयटम कोड नमूद असणे आवश्यक राहील’ अशी अट टाकण्यात आलेली आहे.