औरंगाबाद : पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे पालन न केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा उल्लेख प्रमुख आरोपी म्हणून केला आहे. दरम्यान याबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्त आजच योग्य ती कारवाई करतील अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे.
औरंगाबाद येथील सिटी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ठाकरे यांच्यावर आयपीसी कलम 116, 117, 135, 153 अ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सभेसाठी 16 अटी घालत परवानगी दिली आहे. त्यापैकी 12 अटींचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. औरंगाबाद पोलिसांनी ठाकरेंच्या भाषणाची संपू्र्ण रेकॉर्डिंग ऐकली असून “एकदाचं होवून जावू द्या” हे वाक्य ठाकरे यांना भोवल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज ठाकरेंवरील या कारवाईसंदर्भात गृहमंत्रालयाची आज सकाळपासून खलबत सुरु होती. आज सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पोलिस महासंचालकांसह गृहमंत्रालयाचे अधिकारी आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली.
राज ठाकरे यांना या सभेला परवानगी देण्यापूर्वी औरंगाबाद पोलिसांनी एकूण १६ अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या. यात समाजिक सलोखा बिघडू नये, दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, कोणाच्याही भावना दुखावू नये, चिथावणीखोर वक्तव्य करु नये अशा अटींचा समावेश होता. मात्र राज ठाकरेंच्या या भाषणादरम्यान बहुतांश अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाले असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
राज्यात कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १३ हजार जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणाबाबत विचारले असता रजनीश शेठ म्हणाले, औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाची सखोल पडताळणी केली आहे. त्यासंबंधी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. जी कारवाई करायची आहे ते ती नक्कीच करतील, असेही त्यांनी सांगितले.