निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल

अपसंपदा प्रकरण, ४० हजार पानांचे दोषारोपपत्र

0

पुणे : नोकरी काळात उत्पन्नापेक्षा अधिक बेकायदा अपसंपदा बाळगल्याप्रकरणी नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. २४) ४० हजार पानांचे पहिले दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

नाझीरकर व त्यांच्या कुटुंबीयांकडे ८२ कोटी ३४ लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या नावे आणि भागीदारी असलेल्या ३७ कंपन्या असल्याचे या दोषारोपात करण्यात आले आहे. हनुमंत नाझीरकर, पत्नी संगीता नाझीरकर, गीतांजली नाझीरकर, भास्कर नाझीरकर, खाचा राहुल खोमणे, अनिल शिपकुळे, बाळासाहेब घनवट आणि विजयसिंह धुमाळ अशा ८ जणांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यापैकी हनुमंत नाझीरकर आणि राहुल खोमणे यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही ३० मार्चपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.

हनुमंत नाझीरकर हे नगररचना विभागामध्ये अमरावतीत सहसंचालक म्हणून कार्यरत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. २३ जानेवारी १९८६ ते १८ जून २०२० या ३४ वर्षामध्ये त्यांनी तब्बल ८२ कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता लाचखोरीतून मिळविल्याचे उघड झाले आहे.  हनुमंत नाझीरकर याने ही मालमत्ता २०१० ते २०१६ दरम्यान आपली पत्नी आणि सासरे यांच्या नावावर खरेदी केली आहे.

गुंतविलेल्या पैशांबाबत स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल होणार :
हनुमंत नाझीरकर याच्या ३८ कंपन्या व त्यातील केलेल्या गुंतवलेला पैसा याविषयी दुसरे स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या २० बेनामी मालमत्ताही आढळून आल्या आहेत. त्याबाबतची वेगळी कारवाई आयकर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.