पुणे : भाजपच्या चार महिला आमदारांना अज्ञात भामट्याने ऑनलाईन गंडा घातला आहे. आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चौघींना एका भामट्याने फोन करून आई आजारी असल्याचे कारण देत, त्यांच्याकडून गुगलपे द्वारे रक्कम घेतली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्या भामट्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आई आजारी असल्याचे कारण देत, या व्यक्तीने महिला आमदारांकडून पैसे उकळले. या प्रकरणी पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांची मुलगी पुजा मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पुण्यातल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ऑनलाईन माध्यमातून हे पैश्यांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल आमदार माधूरी मिसाळ यांना एका दुरध्वनीवरून फोन आला. यावेळी त्या त्यांच्या कार्यालयात होत्या. संबंधित व्यक्तीने त्याची आई आजारी आहे.
उपचारासाठी रक्कम लागणार असल्याचे सांगितले. दरम्यान, माधुरी मिसाळ यांना ते खरे वाटले. त्यांनी माणुसकीच्या नात्याने त्या वक्तीच्या मोबाईलक्रमांकावर गुगल ने द्वारे ३४०० रुपये ट्रान्सफर केले. परंतु, या भामट्याने अशाच प्रकारचे फोन हे आमदार श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे यांनाही केल्याचे लक्षात आल्यानंतर, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे आमदार मिसाळ यांच्या लक्षात आले. दरम्यान, आमदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर माधुरी मिसाळ यांच्या मुलीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात जात या प्रकरणी तक्रार दिली आहे. ज्या क्रमांकावरून फोन आला, त्या क्रमांकाची आणि संबंधित व्यक्तीचा तपास पोलिस करत आहे. एकाच वेळी चार आमदारांना फसवण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.