नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. वेगानं कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत असून गुरुवारी दिवसभरात देशात 3 लाख 32 हजारांहून अधिक रुग्ण सापडले. लाखो रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. अशा रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून काय काळजी घ्यायची ते सांगितलं आहे.
कोरोनावर घरीच उपचार करत असणाऱ्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर काय करायला हवं याची माहिती देण्यात आली आहे. देशात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत असताना आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. डॉक्टरांनी ऑक्सिजनची पातळी स्वत: चेक करून रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे की नाही हे ठरवण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, यामध्ये रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो, ते कोरोनाचे एक लक्षण असून त्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून सल्ला देण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि स्वस्थ वाटण्यासाठी पालथं झोपणं हे मदतीचं ठरतं. जर ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा कमी असेल तर घरी असलेल्या रुग्णाने पोटावर पालथं झोपावं. यावेळी तोंड उघडं ठेवावं. तुम्हाला हे करत असताना चार किंवा पाच उशा लागतील. एक उशी मानेखाली, एक किंवा दोन छातीखाला आणि एक मांडीखाली आणि एक गुडघ्यांच्याखाली ठेवावी लागेल.
पालथं झोपल्यानंतर तुम्हाला दर तीस मिनिटाला स्थिती बदलावी लागेल. यामध्ये पोटावर झोपल्यानंतर डाव्या कुशीवर आणि उजव्या कुशीवर झोपा. त्यानंतर पुन्हा झोपण्याआधी काही वेळ बसून राहा. त्यानंतर पुन्हा पोटावर पालथं झोपा. तुम्ही पालथं झोपत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.