रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात

0

रायगड : रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आज तिथीनुसार साजरा होत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री व लाखो शिवभक्तांची उपस्थिती आहे.

रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आले. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ असा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. यावेळी उदयनराजे भोसले यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

रायगडावर प्रशासनाच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर संपूर्ण किल्ले रायगड फुलांनी सजविण्यात आला आहे.

पोलिसांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. पोलिस वाद्यांचे वादन झाले. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा राहिला. त्याचबरोबर विविध ढोलपथकांनी देखील या ठिकाणी वादन केले. ढोलताशकांच्या वादनाने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.