मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांनी घेतले आमदार जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज निधन झाले. दुपारी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले.

राजकारणातील मोठा नेता हरपला : मुख्यमंत्री शिंदे

आमदार लक्ष्मण जगताप हे लढवये नेते होते. त्यांनी आजाराशी मोठी फाइट दिली. त्यांच्या निधनाने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. पिंपरी-चिंचवड आणि राज्याच्या राजकारणात त्यांचे वेगळेपण होते, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

लढवय्या नेत्याची पोकळी जाणवेल : उपमुख्यमंत्री फडणवीस

लक्ष्मण भाऊ हे एक लढवय्या नेते होते. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक चांगले प्रोजेक्ट जगताप यांनी केले. नागरिकांच्या मनातील एक नेता म्हणून त्यांची ओळख होती. आजारी असताना देखील पक्षासाठी ऑक्सिजन रुगवाहिकेतुन मतदानाला आले होते, त्यावेळी तो विजय आम्ही भाऊंना समर्पित केला होता. जगताप यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

शहराच्या जडणघडणीत, विकासात लक्ष्मभाऊंचे मोठे योगदान – खासदार बारणे

मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”गेले अनेक दिवस लक्ष्मण जगताप कर्करोगावर उपचार घेत होते. दीर्घ आजाराने त्यांचे आज निधन झाले. अतिशय कमी वयात नगरसेवक ते आमदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, शहराचे महापौरपद त्यांनी भूषविले. विधानपरिषद आणि विधानसभेचेही ते आमदार झाले. लक्ष्मण जगताप हे शहराचे महापौर असताना मी महापालिका स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. 

परंतु, पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत, विकासात त्यांचे मोठे योगदान होते. सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. गेली अनेक दिवस ते आजारी होते. त्या आजारावर ते मात करतील असे वाटत होते. परंतु, मागील काही दिवसांपासून पुन्हा ते रुग्णालयात दाखल होते. त्यांनी केलेले कार्य, त्यांचा असलेला सहवास पिंपरी-चिंचवडकरांच्या लक्षात राहील. त्यांच्या जाण्याने शहराची मोठी हानी झाली आहे. कर्ततृत्वान नेता काळाच्या आड गेला आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने, मावळ मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो”.

भाऊंचे काम कायम स्मरणात राहील – आमदार लांडगे

भाजपचे शहराध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे म्हणाले, ”भारतीय जनता पार्टीचे नेते, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘बाहुबली’ आमदार आणि माझे मार्गदर्शक लक्ष्मणभाऊ जगताप यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले. शहराच्या राजकारणात तब्बल 35 वर्षे आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या भाऊंनी पिंपरी-चिंचवड शहराच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे.

जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी आज आपण गमावला आहे. भाऊंनी राजकीय, सामाजिक जीवनात केलेले काम कायम स्मरणात राहील. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. पिंपरी-चिंचवड शहर एका ध्येयवादी, दूरदृष्टीच्या नेत्याला मुकले असून, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न येणारी हानी आज झाली आहे. तमाम पिंपरी-चिंचवडकर जगताप कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेत”.

 

शहराचे मोठे नुकसान : आमदार बनसोडे
आमदार लक्ष्मण भाऊंच्या जाण्याने शहराचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी कधीही भरून न येणारी आहे, पिंपरी चिंचवड शहरातील एक दृष्टा नेता हरपल्याची खंत जनसामान्यांमध्ये आहे. भाऊ दूरदृष्टी असलेले लोकनेते होते,  ते नेहमीच शहाराच्या विकासासाठी काय करतायेईल यासाठी नवनवीन योजना व कल्पना आखत…त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो, अशा शब्दात आमदार अण्णा बनसोडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मैत्री जपणारा मोठा सहकारी गेला – माजी आमदार लांडे

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे म्हणाले, ”मी आणि लक्ष्मण जगताप आम्ही दोघांनी महापालिकेत, विधानसभेत एकत्र काम केले. आमची अतिशय जवळची मैत्री होती. त्यांनी नात्याच्या पलिकडे जावून मैत्री जपली. शहरात वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे काम लक्ष्मणभाऊंनी केले. नागरिकांचे काम झाले पाहिजे, यासाठी त्यांची सातत्याने तळमळ होती. दूरदृष्टी ठेवून काम करणारा नेता हरपला. आमच्या तीन पिढ्यांचे जगताप कुटुंबियांशी नाते आहे. नात्यापेक्षा मैत्री जपणारा मोठा सहकारी गेला आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन येणार नाही. त्यांच्या जाण्याने शहराचे फार मोठे नुकसान, हानी झाली आहे.

स्पष्टपणे, कोणाची भीड न ठेवता बोलणारा, तत्वाशी एकनिष्ठ असणारा आमचा सहकारी गेला आहे. स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनीच निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प उभारले. सत्ता असतानाही कामे होत नसतील तर आमदारकीचा राजीनामा देवू असे ते पोटतिडकीने बोलायचे. सत्ता असूनही आपली कामे होत नाही. त्यापेक्षा सत्तेत न राहणे बरे असे म्हणायचे. शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, नवीन गावे पालिकेत समाविष्ट केली पुन्हा वगळली त्याविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली”.

लक्ष्मणभाऊ म्हणजे जीवाला जीव देणारा भाऊ – वाघेरे

माजी महापौर संजोग वाघेरे म्हणाले, ”लक्ष्मणभाऊ, मी आणि विलास लांडे आम्ही तिघांनी महापालिका सभागृहात एकत्र काम केले. मी महापौर असताना ते नगरसेवक होते आणि ते महापौर असतानाही मी नगरसेवक होतो. 15 वर्षे आम्ही महापालिका सभागृहात सोबत होतो. एकोप्याने शहर विकासाचे निर्णय घेत होतो. भाऊंना विकासाची दूरदृष्टी होती. जीवाला जीव देणारा लक्ष्मणभाऊ माणूस होता”.

माजी महापौर आझमभाई पानसरे म्हणाले, ”मी आणि लक्ष्मणभाऊंनी अनेक वर्ष महापालिका सभागृहात सोबत काम केले. माणूस म्हणून लक्ष्मणभाऊ एकदम चांगला होता. सर्वांना समजून घेत होता”.

Leave A Reply

Your email address will not be published.