मुंबई : मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याचा सपशेल फ्लॉप शो झाला, अशी टीका आज शिवसेनेने केली आहे. शिंदे यांनी कोणी तरी लिहून दिलेले भाषण वाचले. त्याचा संदर्भ लावताना शिंदे अनेकदा अडखळले. त्यामुळे त्यांच्या भाषणात सूर आणि नूरही नव्हता, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनात म्हटले आहे.
शिंदेंच्या भाषणावर टीका करताना शिवसेनेने म्हटले आहे की, महाविकास आघाडीने केलेल्या कामांची यादीच स्वतःच्या सरकारची कामे म्हणून वाचून दाखवणे, मोदी-शहांचे गोडवे गाणे आणि केलेला फुटीरपणा कसा योग्य आहे याची कॅसेट शिंदेंनी पुनः पुन्हा वाजवली. त्यातच त्यांचे भाषण सुरू असताना अर्ध्या लोकांनी मैदान सोडून थेट घराची वाट धरली. त्यामुळे शिंदेंनी करोडोंचा खर्च करून माणसे आणली, पण त्यांना त्याच गर्दीने धोका दिल्याची सर्वत्र चर्चा सुरू होती.
बीकेसी मैदानावर गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाने गावागावातून लोकांची जमवाजमव केल्याचे स्पष्टपणे दिसत होते, असा आरोपही शिवसेनेने केला. पुढे शिवसेनेने म्हटले की, बीकेसीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी सव्वा तासाच्या भाषणातील प्रत्येक ओळ वाचून दाखवली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात जोश नव्हता. तसाच उपस्थितांमध्येही जोश दिसत नव्हता. टाळ्याही पडत नव्हत्या. भाषण लांबत गेले. शेवटी कंटाळलेल्या लोकांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली.
दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना थेट धमकीच दिली. आमच्या विरोधात बोलल्यावर काय होते ते माहिती आहे ना ,अशा शब्दांत धमकावले, असा हल्लाबोल शिवसेनेने केला.
सर्व मराठी टीव्ही चॅनेल तसेच युट्यूबवर शिवतीर्थावरील शिवसेनेच्या मेळाव्याचे व बीकेसीवरील मेळाव्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. याबाबत शिवसेनेने एका वृत्तवाहिनीचा दाखला देत दावा केला की, एका चॅनेलवर शिवतीर्थावरील शिवसेनेचा मेळावा बघणाऱ्यांची संख्या 70 हजार तर याच चॅनेलवर बीकेसीचा मेळावा बघणाऱ्यांची संख्या फक्त 15 हजार होती. उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू झाले तेव्हा त्या चॅनेलवर भाषण ऐकणाऱ्यांची संख्या 86 हजारांपेक्षा अधिक तर इतर सर्व वाहिन्या मिळून उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणाऱ्यांची संख्या सव्वा लाख होती. तर, सर्व वृत्तवाहिन्यांचे आकडे मिळूनही बीकेसीतला मेळावा 50 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईव्ह पाहिला नाही. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणाऱ्यांचा आकडा वाढत होता तर एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणाऱ्यांची संख्या कमी होत गेली.
राज्याच्या विविध भागांतून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या 100 पेक्षा जास्त गाड्यांवर छात्रभारतीने पोस्टर झळकावून 0 ते 20 पटसंख्येच्या शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला, असा दावाही शिवसेनेने केला. शिवसेनेने म्हटले की, राज्य सरकारने विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाचे पडसाद ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर उमटले असून घराजवळची शाळा बंद झाल्याने हे विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. याविरोधात छात्रभारतीने आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधाचे पोस्टर बीकेसीवरील मेळाव्यासाठी येणाऱ्या 100 हून अधिक गाड्यांवर चिकटवले.